खेड परिषद निवडणूक : नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार वैध

 

खेड (प्रतिनिधी) –
खेड नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीचे प्राथमिक चित्र समोर आले आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ५ अर्ज वैध ठरले असून ३ अर्ज अवैध ठरले आहेत. छाननीदरम्यान कागदपत्रांमधील त्रुटी, अपूर्ण माहिती, तसेच नियमानुसार आवश्यक पुरावे नसल्यामुळे 3 अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
या अवैध अर्जांमध्ये प्रामुख्याने भाजपच्या वैभवी वैभव खेडेकर यांचा समावेश आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र तो अर्ज छाननीत अपात्र ठरला. तथापि, त्यांनी स्वतंत्रपणे दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मात्र वैध ठरला आहे. त्यामुळे वैभवी खेडेकर या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात राहणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 नगरसेवक पदासाठी एकूण ८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर १७ अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे ६५ उमेदवारांचे अर्ज वैध मान्य झाले असून हे सर्व उमेदवार आता नगरसेवक पदासाठीच्या निवडणूक रिंगणात राहणार आहेत. विविध पक्षांमधून तसेच अपक्ष म्हणून मोठ्या संख्येने उमेदवार पुढे आल्याने नगरसेवक पदासाठी मोठी चुरस निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
आता २१ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने अंतिम स्पर्धेचे चित्र त्या दिवशी निश्चित होईल. काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता असल्याने सध्या दिसत असलेल्या रिंगणात आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे समोर आले असून नगराध्यक्ष पदासाठी पाच आणि नगरसेवक पदासाठी ६५ उमेदवारांमध्ये रंगतदार लढत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये खेड नगरपरिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.