संतोष कोत्रे lलांजा -: लांजा तालुक्याच्या पश्चिम भागातील वीस ते पंचवीस गावांतील प्रवासी, नोकरदार आणि चाकरमानी यांच्यासाठी फायदेशीर ठरणारी लांजा- इसवली- बोरवली एसटी बस कायमस्वरूपी चालू करण्याची मागणी दशक्रोशीतील
ग्रामस्थांतून केली जात आहे
लांजा- इसवली- बोरवली एसटी कायमस्वरूपी चालू होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील लांजा आगाराकडून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे असे सामाजिक कार्यकर्ते सचिन मेस्त्री यांनी सांगितले. इसवली ग्रामपंचायत, बेनी बुद्रुक ग्रामपंचायत व इतर ग्रामपंचायतीने सुद्धा इसवली बोरवली एसटी चालू होण्यासाठी लांजा आगारप्रमुख श्रीमती काव्या पेडणेकर यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. तरी देखील एसटी अद्याप चालू करण्यात आलेले नाही. तसेच केलेल्या पत्रव्यवहाराची प्रत परिवहन खाते मंत्रालय मुंबई यांच्याकडे देखील पाठपुरावा केला आहे तरीदेखील इसवली बोरवली एसटी अद्याप चालू होत नसल्यामुळे एसटी प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या मार्गावरील इसवली, पनोरे, खानवली, बेनी बुद्रुक, साटवली, गोळवशी, रूण, सडवली, बापेरे, खावडी, इंदवटी, जावडे तसेच या गावच्या आजूबाजूच्या गावाला देखील या एसटी वाहतुकीचा मोठा फायदा होईल. या गावांना एसटी शिवाय कोणता दुसरा पर्याय मार्ग नाही. कारण रेल्वे टेशन ५२ किलोमीटर अंतरावर आहे .त्यामुळे एसटी ची फेरी या मार्गावर कायमस्वरूपी चालू करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन मेस्त्री व प्रवासी वर्गातून होत आहे.
दरम्यान,अशाप्रकारे एसटी प्रशासनाकडून लोकांच्या रास्त मागणीबाबत कार्यवाही होत नसल्याने आमदार किरण सामंत यांनी याकडे लक्ष देऊन ही बस कायमस्वरूपी चालू करण्यात व्हावी यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.











