शिवसेना कुडाळ – मालवण चे आमदार निलेश राणे यांचे आवाहन
नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, कणकवलीसाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही

कणकवली : कणकवली शहरासमोरील प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवणे आणि विकासाला गती देण्यासाठी शहर विकास आघाडी आम्ही सर्वांनी मिळून तयार केली आहे. कणकवली शहर राजकारणाचे नाक असून आज शहराला स्थिरता आणि शांततेची गरज आहे. सर्वांगीण विकासाची गरज आहे.लोकांच्या व्यथा मिटवण्यासाठी शहर विकास आघाडीला साथ द्या, असे आवाहन शिवसेना (शिंदेगट) कुडाळ – मालवण चे आमदार आणि सेनेचे स्टार प्रचारक आमदार निलेश राणे यांनी केले.
कणकवली येथे माजी आम. राजन तेली यांच्या निवासस्थानी आयोजित शहर विकास आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, सतीश सावंत, संजय आग्रे, नागेश मोरये यांच्यासह शहर विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. निलेश राणे म्हणाले, कोणाच्या आदेशाची वाट पाहू नका,प्रचाराला रथी महारथी उतरणार आहेत. जीवाचे रान करू, रक्ताचे पाणी करू,
आणि शहर विकास आघाडी निवडून आणू.नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. या खात्यामार्फत कणकवलीला आवश्यक तेवढा निधी मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. संदेश पारकर हे जिद्दी नेतृत्व आहे. पराभवानंतर खचून न जाता त्यांनी पुन्हा निवडणुकीत उभे राहून कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली आहे. संदेश पारकर यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करू परंतु कुठेही कमी पडणार नाही. शहर विकास आघाडी तयार होताना अनेकांनी पदांचा त्याग केला. ही परिस्थिती का निर्माण झाली, याचा विचार करण्यासारखा आहे.
लोकांमध्ये आमच्या आघाडीबद्दल सहानुभूती आहे. शहरात झेंडा हा शहर विकास आघाडीचाच लागला पाहिजे. ३ डिसेंबर ला गुलाल आपलाच उधळला गेला पाहिजे, असेही आम. निलेश राणे यांनी उपस्थित शहरविकास आघाडीच्या उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधित केले.











