देवदिवाळी निमित्ताने गवळदेव उत्सव मंडळाच्या वतीने आयोजन
शिरगाव (प्रतिनिधी)देवगड तालुक्यातील शिरगाव गावठण येथील गवळदेव उत्सव मंडळाच्या वतीने शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी देवदिवाळीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव-शेवरे ग्रामसचिवालयाजवळ श्री गवळदेव येथे हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.
सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, तर दुपारी ३ वाजता वार्षिक गाऱ्हाणे व नवसफेड होणार आहे. सायंकाळी ६ वाजता स्थानिक सुस्वर भजनांनी भक्तिमय वातावरण रंगणार असून रात्री ९ वाजता डबलबारी भजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात देवगड तालुक्यातील नाडण येथील श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ (बुवा संदीप पुजारे) तसेच कणकवली तालुक्यातील हरकूळ बुद्रूक येथील श्री कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ (बुवा सुजित परब) यांच्यात होणार आहे.
शिरगाव दशक्रोशीतील सर्व भाविकांनी या उत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन गवळदेव उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.









