केळशी – एचपीव्ही लसीकरण उपक्रम यशस्वी; विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण

केळशी : येथील कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र केळशी आणि उपकेंद्र उटंबर ता. दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही (HPV) लसीकरण सत्र यशस्विरित्या पार पडले. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या लसीकरण मोहिमेत शाळेतील अनेक विद्यार्थिनींनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला.

लसीकरण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली गुहागरकर, डॉ. योगेश्वरी राठोड, समुदाय आरोग्य अधिकारी राहुल आंधळे, उपकेंद्र उटंबर येथील कर्मचारी, शाळेचे शिक्षकवर्ग तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

HPV लस पूर्णपणे सुरक्षित असून मुलींच्या निरोगी भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. जास्तीत जास्त पालकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे यांनी केले.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा मजबूत करणे या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून या मोहिमेला पालक आणि शाळेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.