खेड – गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी खेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रभाग क्रमांक ५-ब मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार श्रीमती जयमाला पाटणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची अधिकृत नोंद निवडणूक विभागाने केली आहे. २१ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
खेड शहरात महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत उतरला आहे. मात्र प्रभाग ५-ब मध्ये त्यांच्या उमेदवाराच्या माघारीनंतर आता या प्रभागातील महाआघाडीच्या समीकरणात बदल झाला आहे. या जागेवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या सुनिता सागर खालकर या अधिकृत उमेदवार म्हणून मशाल या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. सकाळपासूनच निवडणूक कार्यालयात उमेदवारी मागे घेण्यासाठी उमेदवार आणि प्रतिनिधींची गर्दी दिसत होती. त्याचदरम्यान जयमाला पाटणे यांनी अधिकृतरीत्या माघार घेतल्याने प्रभाग ५-ब मधील निवडणुकीची लढत नवीन वळणावर गेली आहे. सुनिता खालकर यांच्या प्रवेशामुळे या प्रभागातील स्पर्धा अधिक चुरशीची होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. दरम्यान, निवडणूक विभागाने पाटणे यांच्या माघारीची नोंद करून अद्ययावत उमेदवार यादी प्रसिद्ध केली असून उद्या, २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.












