महायुतीसाठी शिवसेनेचे प्रयत्न प्रामाणिकच- माजी आमदार सदानंद चव्हाण

चिपळूण : येथील नगरपरिषद निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी महायुतीतील सर्व पक्षांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता महायुती टिकणार की तुटणार? याविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणाला याबद्दल काय वाटतंय याची दखल घेण्याची गरज वाटत नाही. कारण महायुतीसाठी शिवसेनेचे प्रयत्न प्रामाणिकच होते आणि आहेत, अशी भूमिका शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी स्पष्ट केली.

सदानंद चव्हाण पुढे म्हणाले की, केंद्र, राज्याप्रमाणे इथेही महायुतीने निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा होती. पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. लोकसभेत भाजपला प्रतिनिधित्व मिळाले, विधानसभेत राष्ट्रवादीला प्रतिनिधीत्व दिले गेले. या न्यायाने नगरपरिषदेत शिवसेनेला नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी ही आमची स्वाभाविक भावना होती. विद्यमान नगराध्यक्ष आपला स्वतःच्या पक्षाचा असताना देखील भाजपने शिवसेनेला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यास सहमती दर्शवली. मात्र, राष्ट्रवादीने आपली नगराध्यक्ष पदाची मागणी कायम ठेवली. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलिंद कापडी यांनी राष्ट्रवादी नगराध्यक्ष पदासह २७ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे रविवारीच (दि.१६ रोजी) जाहीर करून टाकले. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? असा प्रश्न सदानंद चव्हाण यांनी उपस्थित केला.

ते आणखी पुढे म्हणाले की, शिवसेना – भाजपात कुठेही अडचण नव्हती. तर शिवसेना राष्ट्रवादीतही कुठे अडचण नव्हती. एक दोन जागांवर भाजपा आणि राष्ट्रवादी मध्ये वाटाघाटी सुरु होत्या. असे असताना राष्ट्रवादीने अचानक प्रभाग क्रमांक ११ मधून किशोर रेडीज यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. दुसरीकडे प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिवसेनेच्या निश्चित झालेल्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला. हा प्रकार न समजण्यासारखाच होता, असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणतात की, आज अतीव दुःख होत असल्याचा कांगावा करणाऱ्यांनी याचा विचार देखील करायला हवा असे श्री.चव्हाण यांनी म्हटले आहे. ना. उदय सामंत महायुती साठी कालही अनुकूल होते आणि आजही आहेत. महायुतीसाठी शिवसेना कालही आग्रही होती आणि आजही आहे. मात्र, दुर्दैवाने महायुती न झाल्यास त्याचा दोष शिवसेनेला देणे योग्य होणार नाही, असे बजावताना शून्यातून उभे राहणे शिवसेनेला नवीन नाही असेही सदानंद चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.