कोण होणार लोकनियुक्त नगराध्यक्ष? महायुती? महाविकास आघाडी आणि अपक्षांची प्रतिष्ठा पणाला
लांजा -: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज शुक्रवारी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात विशेष उत्कंठा आहे ती लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची. नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली महायुती जिंकणार? महाविकास आघाडी की अपक्ष बाजी मारणार ? याचे चित्र ३ डिसेंबर रोजी स्पष्ट होणार असले तरी सध्याची अटीतटीची आणि चुरशीची लढत लक्षात घेता या तिरंगी लढतीमध्ये कोण होणार नगराध्यक्ष? हे पाहणे लांजावासियांसाठी औस्सुक्याचा भाग बनला आहे.
लांजा नगरपंचायतीच्या १७ नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आज शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदा साठीच्या लढतीचे चित्र हे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरपंचायतीच्या १७ पैकी १६ जागा या महायुती लढत असून जवळपास १४ जागांवर महाविकास आघाडी लढत आहे. तर १७ पैकी १७ ही जागांवर अपक्ष लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या ही सर्वाधिक आहे. नगरपंचायतीचा प्रभाग क्रमांक सहा म्हणजे देवराई- आगरवाडी या मतदारसंघातून दरवर्षी येथील प्रभागातील नागरिक हे अपक्षपणे आपला उमेदवार बिनविरोध निवडून देत असतात. त्यामुळे या ठिकाणी कोणताही राजकीय पक्ष आपला उमेदवार देत नाही. गेल्या सलग दोन वर्षे या प्रभागातून आगरवाडी येथील उमेदवार निवडून आलेले आहेत. यावेळी या प्रभाग क्रमांक सहा मधून देवराईला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील
अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहे.
उर्वरित नगरसेवक पदाच्या १६ ही जागांवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवारी पेश करताना सर्वच्या सर्व जागा जिंकून आणण्याचे दावे केले जात आहेत. असे असले तरी त्या त्या प्रभागात असलेल्या अपक्ष उमेदवारांचे पारडे देखील जड आहे. काही प्रभागात तर अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो अशीही शक्यता निर्माण झालेली आहे. गतवेळच्या काही नगरसेवकांनी यावेळी उमेदवारी न मिळाल्याने अपक्षपणे रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाही फटका राजकीय पक्षांच्या उमेदवाराला बसू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही. तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापित राजकीय उमेदवारासमोर तगडे आव्हान निर्माण केल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. मात्र किंगमेकर अशी बिरूदावली असणारे आमदार किरण सामंत हे या निवडणुकीत स्वतः जातीनिशी उतरल्यास सध्याचे चित्र बदलेल असा दावा महायुतीकडून केला जात आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून देखील महायुतीला चांगलीच टक्कर दिली जात आहे. यापूर्वी वादग्रस्त ठरलेला डीपी प्लॅन, लांजा डम्पिंग ग्राउंड यासारखे महत्त्वाचे मुद्दे घेऊन महाविकास आघाडी या प्रचारात उतरली आहे. त्यांचे हे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते कितपत यशस्वी ठरतात यावरून त्यांची पुढील वाटचाल किंबहुना त्यांची ताकद व राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
नगरसेवक पदाबरोबरच लांजाविसियांचे लक्ष लागून राहिले आहे ते नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे. या निवडणुकीत शिवसेना भाजपा राष्ट्रवादी या महायुतीकडून सावली सुनील कुरूप या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यांची राजकीय पार्श्वभूमी काहीही नसली तरी त्यांच्या मागे त्यांचे पती, माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील उर्फ राजू कुरूप यांची राजकीय ताकद आहे. या खेरीज आमदार किरण सामंत यांचा असलेला राजकीय करिष्मा, प्रचारासाठी असलेली शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी फळी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. दस्तुरखुद्द किंगमेकर, आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाची ही निवडणूक लढवली जात असल्याने ही निवडणूक हेवीवेट मानली जात आहे. किंबहुना सावली सुनील कुरुप या राजकारणात नवीन व क्लिन चेहरा असल्याने व सर्वच बाजूंनी त्या स्ट्रॉंग असल्याने त्यांच्या विजयाचा भक्कम दावा महायुतीकडून केला जात आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, गटनेत्या, उपनगराध्यक्ष अशी विविध पदे भूषवलेल्या पूर्वा मंगेश मुळे या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. अभ्यासू नगरसेविका आणि क्लीन चेहरा अशी त्यांची ओळख आहे. डीपी प्लॅन, डम्पिंग ग्राउंड यासारखे प्रकल्प रद्द करण्याचा वचननामा त्यांनी जाहीर केलेला आहे. संपूर्ण लांजा शहराचा कायापालट करण्याबाबतचा त्यांचा वचननामा मतदारांना किती भावतो? आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासाठी किती झटून काम करणार यावर त्यांच्या विजयाची मदार आहे. तसेच अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी प्राचारात आघाडी घेतलेली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना विजयी होण्यासाठी कशी साथ लाभते?, जनतेच्या मनात ते आपला ठसा कितपत उमटवणार यावरच ?त्यांची पुढील भविष्य ठरणार आहे.
तर शिवसेना भाजपा महायुतीमुळे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या भाजपाचे माजी नगरसेवक संजय यादव यांनी आपली पत्नी प्रियांका संजय यादव यांना अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे. कमळ ही पक्षाची निशाणी त्यांच्याकडे नाही हा त्यांचा मायनस पॉईंट असला तरी भाजपाचे माजी नगरसेवक, गटनेता म्हणून त्यांनी यापूर्वी चांगली कामगिरी केलेली आहे. लांजा नगरपंचायतीच्या काही वाड्यांमध्ये त्यांची स्वतःची अशी होट बँक आहे.. प्रियांका यादव या उच्चशिक्षित उमेदवार आहेत. याशिवाय भाजपाचे लांजा शहरातील बहुसंख्य पदाधिकारी हे त्यांच्यासाठी जीवाचे रान करताना दिसून येत आहेत. उच्चशिक्षित आणि समस्यांची जाण असलेला उमेदवार विकासाच्या माध्यमातून शहराचा कायापालट करू शकतो ही बाब नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जनमानसाच्या मनावर बिंबवण्यात ते यशस्वी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या खेरीज डीपी प्लॅन, डम्पिंग ग्राउंड यासारख्या
लोकांच्या टोकाचा विरोध असलेल्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने जनतेच्या बाजूने आवाज उठवलेला आहे. तर निवडणुकीच्या अखेरच्या काही दिवसांमध्ये संजय यादव हे बलाढ्य नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.
एकूणच लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि अपक्ष यांच्यातच होणार आहे. तीनही उमेदवारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? आमदार किरण सामंत यांचा किंगमेकर चा जलवा चालणार ? की महाविकास आघाडीच्या उमेदवार अनपेक्षितपणे बाजी मारणार की या दोघांनाही बाजूला सारुन अपक्ष उमेदवार प्रियांका यादव यांचे नशीब फळफळणार? हे तीन डिसेंबर रोजी स्पष्ट होईल. तूर्तास तमाम लांजा आणि कुवेवासीय नागरिकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.












