चिपळूण (प्रतिनिधी): सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे इयत्ता पाचवी ते बारावीच्या सुमारे २२०० विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची सामूहिक शपथ घेतली. वाढत्या प्रदूषणाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यालयाचे विज्ञान शिक्षक गणेश बागवे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्त्व पटवून दिले. फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण, तसेच पशुपक्ष्यांना होणारा त्रास याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला. दिवाळीच्या खरेदीसाठी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करणे, प्लास्टिक टाळणे, वृक्षसंवर्धन करणे आणि इतरांनाही पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी प्रेरित करणे, अशा विविध संकल्पांचा विद्यार्थ्यांनी शपथेमध्ये समावेश केला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्यराजेंद्र वारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, फटाके फोडल्यामुळे हवेचे व ध्वनीचे प्रदूषण होते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आपण आपल्या कुटुंबासह प्रदूषण टाळण्यासाठी खारीचा वाटा उचलल्यास पर्यावरण संवर्धनास निश्चितच मदत होईल. पाणी ही आपली जीवनवाहिनी असून त्याचे प्रदूषण रोखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘फटाके टाळा, पर्यावरण सांभाळा’ हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा. या कार्यक्रमासाठी प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी तसेच सकाळ सत्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. २२०० विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या सामूहिक शपथेमुळे सावर्डे परिसरात पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश प्रसारित झाला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक सामाजिक जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम विद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेला एक स्तुत्य उपक्रम ठरला.
Home महत्वाच्या बातम्या सावर्डे विद्यालयात इको फ्रेंडली दिवाळीचा संकल्प; २२०० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ













