राजापूर नगर परिषदेवर महायुतीचीच सत्ता येणार

राहुल पंडीत व दीपक पटवर्धन यांचा दावा
आ. किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली राजापूर शहराच्या सर्वांगिण विकासाला गती देणार

राजापूर । प्रतिनिधी : आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत राजापूर वासीय महायुतीवर विश्वास दाखवतील व राजापूर नगर परिषदेवर महायुतीचीच सत्ता येईल असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत व भाजपाचे निरीक्षक दीपक पटवर्धन यांनी राजापूरात पत्रकार परिषदेत केला.
राजापूर शहराचा विकासाचा बॅकलॉक भरून काढायचा आहे, राजापूर शहरातील नागरीकांना चांगल्या सेवा सुविधा देतानाच शहराच्या विकासाला एक नवी दिशा द्यावयाची आहे. त्यासाठी महायुतीची सत्ता या नगर परिषदेवर येणे आवश्यक असून त्यासाठी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने काम करत असल्याचेही पंडीत व पटवर्धन यांनी सांगितले. आ. किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगिण विकासाला महायुती गती देईल असेही त्यांनी नमुद केले.
राजापूर नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राजापुरात शिवसेना, भाजपा महायुतीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पंडीत व पटवर्धन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आ. किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे. रविवारी २२ नोव्हेंबर रोजी आ. सामंत यांना निवडून येऊन एक वर्ष पुर्ण होत आहे. या एका वर्षाच्या कार्यकाळात आ. सामंत यांनी केलेले काम आणि घेतलेला विकासाचा ध्यास जनतेसमोर आहे. त्यामुळे आता राजापूर शहरातील जनताही आ. सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सत्ता हातात देईल यात कोणतीही शंका नसल्याचे राहुल पंडीत यांनी सांगितले. आंम्ही विकासाचा ध्यास घेऊन काम करणारी मंडळी आहोत, त्यामुळे नगराध्यक्षपदासहह सर्वच्या सर्व जागा आंम्ही जिंकू असा दावा पंडीत यांनी केला.
महायुती म्हणून आंम्ही राजापूरची निवडणूक आ . किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत. भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे,मात्र त्यांची समजूत काढण्याचे काम सुरू असून दोन दिवसात त्यावरही निर्णय होईल. भाजपा हा शिस्त मानणारा पक्ष आहे. महायुतीबाबतचा जो निर्णय भाजपाच्या शिरशस्त नेत्वृत्वाने घेतला आहे त्याची अंमलाबजावणी करणे भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे आणि ते आपणासह सर्वजण पार पाडतील असा दावा भाजपाचे पक्ष निरीक्षक दिपक पटवर्धन यांनी केला.
या पत्रकार परिषदेला आ. किरण सामंत, भाजपा महिला प्रदेश सचिव शिल्पा मराठे, शिवसेना जिल्हा संघटक विलास चाळके, महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रृती ताम्हनकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले, एड. शशिकांत सुतार, एड. यशवंत कावतकर आदी उपस्थित होते.