आमचं ध्येय विकासाचं व स्पर्धाही विकासाची त्यामुळे विजय निश्चित : प्रभाकर सावंत 

श्रद्धाराजे भोंसले व्हिजनरी नेतृत्व असल्याने युवा पिढीची समर्थ साथ 

मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष तसेच खासदार नारायण राणे यांच्या होणार सभा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : जिल्ह्यात चारही ठिकाणी भाजप स्वबळावर लढत आहे. प्रचारात आघाडी घेतली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदासाठीचे ८१ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप विकासाच्या मुद्यावर लढत आहे. आमची कोणाशीही स्पर्धा नाही. आमची स्पर्धा विकासाची व ध्येयही विकासाचेच असल्याने आमचा विजय निश्चित असून चारही ठिकाणी नगराध्यक्ष पदासह आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात भाजपचं नाव करत आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल होत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर त्या क्षेत्राचा कायापालट करते. वेंगुर्लेत भाजपची सत्ता होती‌. त्यावेळी देशात नावलौकिक प्राप्त केला. खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणेंची साथ आम्हाला विकासासाठी लाभते. आमच्या हातात सत्ता दिल्यानंतर आम्ही कशाप्रकारे काम करतो हे या माध्यमातून सिद्ध झालेलं त्यामुळे जनता विकासाच्या मुद्द्यावर आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

*श्रद्धाराजे भोसले व्हिजनरी नेतृत्व*

सावंतवाडीतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचं व्हीजन चांगलं आहे‌. त्यांचं नेतृत्व व्हीजनरी नेतृत्व आहे‌. देश-विदेशात फिरल्यामुळे त्यांना विकासाची जाण आहे. नवे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून त्या काम करू शकतात. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी नव्या पिढीला अमृता पिढी असे संबोधित केले आहे. त्यामुळे आमचे नगराध्यक्ष व नगरसेवक हे नव्या पिढीच नेतृत्व करतील असा विश्वासही श्री. सावंत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, खा. नारायण राणे हे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या सभा होणार आहेत. सावंतवाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे अशा स्टार प्रचारकांची सभा सावंतवाडीत होईल, त्याबाबतची माहीती लवकरच जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडीत १ वर्षासाठी भाजपचे नगराध्यक्ष होते‌. पण, कोरोनाकाळ तसेच बहुमत नसल्याने काही विकासकाम अपूर्ण राहीलीत ती आता पूर्ण होतील‌ अशी ग्वाही देतानाच बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता नाही असं विधान त्यांनी केलं.

यावेळी भाजप युवा नेते संदीप गावडे, माजी नगरसेवक मनोज नाईक, रविंद्र मडगावकर, गुरूनाथ पेडणेकर, शितल राऊळ आदी उपस्थित होते.