मालेगावमधील ‘त्या’ विकृत नराधमास फाशीची शिक्षा द्या- जरीन रुमानी

चिपळूण  : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. दि. १६ नोव्हेंबर रोजी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले. या घटनेचे पडसाद चिपळूण गोवळकोट येथे मेणबत्ती पेटवून निषेध करण्यात आला.
चिपळूण गोवळकोट येथील अपना सहयोग फाउंडेशनच्या चेअरमन जरीन रुमानी आणि युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांच्या सहकार्याने मेणबत्ती पेटवून संताप व्यक्त केला. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्तेच्या भयंकर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ चिपळूण गोवळकोट येथील अपना सहयोग फाउंडेशनच्या चेअरमन जरीन रुमानी यांनी मेणबत्ती पेटवून “आपल्या मुलींची सुरक्षा ही आपल्या हातात आहे. नराधमाना कठोर शिक्षा झाली तरच समाज बदलू शकतो.” अशी घोषणा देत निषेध करत संताप व्यक्त केला. याबाबतचे निवेदन गृहमंत्री योगेश कदम यांना दिले. तसेच आरोपीवर तातडीने फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातील कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी अपना सहयोग फॉउंडेशन चेअरमन जरीन रुमानी, शर्वरी चौगुले , मिसबा दस्तगीर, तहसीन खेडकर, जमीला शहा, शकिरा लोकरे, सलमा पालोजी, साजन पटाईत, रुबीना सुर्वे, मर्जीया खेरटकर, रुक्सार नाईक, जैबुन शाटी, सुरज्या बगदादी यांनी केली.