दोन बैलपाडे आणि जर्सी गाईची दाटीवाटीने वाहतूक!
चालकासह तिघांवर गुन्हा दाखल, ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त!
कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट चेकपोस्ट येथे विनापरवाना तसेच जनावरांना निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबून वाहतूक करणारा महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो पोलिसांनी पकडला. सोमवारी (ता. २) रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या टेम्पोमधून दोन बैलपाडे आणि एका जर्सी गाईची वाहतूक केली जात होती. याप्रकरणी टेम्पोचालकासह तिघांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजेंद्र श्रीकांत पाटील (वय ३५), विजय पुंडलिक मोरे (वय ५४, दोघेही रा. मोरेवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) आणि नितेश मंगेश डामरे (वय २६, रा. असलदे डामरेवाडी, ता. कणकवली) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत राठोड आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश फाळके हे सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून फोंडाघाट चेकपोस्ट येथे वाहन तपासणीची ड्युटी बजावत होते. रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास फोंडा बाजारपेठेकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा पांढऱ्या रंगाचा महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो त्यांनी तपासणीसाठी थांबविला. टेम्पोच्या मागील हौद्यात दोन बैलपाडे आणि एक जर्सी गाय असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी चालकाकडे जनावरांच्या वाहतुकीचा परवाना मागितला असता, त्याच्याकडे कोणताही परवाना आढळला नाही. तसेच जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था न करता त्यांना दाटीवाटीने कोंबून आणि बांधून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी कणकवली पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, हवालदार डी. डी. मिठबावकर आणि पोलीस कॉन्स्टेबल महामुनी हे सरकारी वाहनाने घटनास्थळी दाखल झाले. पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर संबंधित टेम्पो आणि जनावरांना पुढील कारवाईसाठी कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
या कारवाईत सुमारे ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचा महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो, ९ हजार रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा बैलपाडा, ९ हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा जर्सी बैलपाडा आणि १० हजार रुपये किमतीची तांबूस रंगाची जर्सी गाय, असा एकूण ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१, भारतीय न्याय संहिता २०२३ आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील संबंधित कलमांनुसार तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास हवालदार सुभाष शिवगण करत आहेत.













