राजापुरात 3 डिसेंबरला गुलाल महायुतीचाच- आ. किरण सामंत

घराघरात पोहचा आणि महायुतीला विजयी करा
महायुतीच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचा शुभारंभ

राजापूर । प्रतिनिधी : राजापूर वासीयांच्या सर्वांगिण विकासासाठी महायुतीला निवडून देण्याचा निर्धार राजापूर वासीयांनी केलेला आहे. तुंम्ही प्रत्येकाने घराघरात पोहचून महायुतीचा प्रचार करा आणि नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना विजयी करण्याचे आवाहन करा. महायुतीच्या एकजुटीचा आणि विजयाचा गुलाल आपणच ३ डिसेंबरला उधळायचा आहे हे लक्षात ठेवा असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी येथे केले.
राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी महायुतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ सोमवारी आ. किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू यांच्या हस्ते फित कापून व भाजपा जिल्हाउपाध्यक्ष अभिजित गुरव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. जवाहर चौकात श्री देव चव्हाटा मंदिर नजीक हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
या शुभारंभ प्रसंगी आ. सामंत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते अविनाश लाड, संपर्क प्रमुख विलास चाळके, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रृती ताम्हनकर, भाजपा महिला प्रदेश सचिव शिल्पा मराठे, अमित केतकर, अभिजित गुरव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आ. किरण सामंत यांनी या कार्यालयाच्या माध्यमातुन प्रचारचे नियोजन केले जाईल असे सांगून आता उर्वरित सात दिवसात मतदारांपर्यंत पोहचा आणि आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असे आवाहन केले. आपल्याला राजापूर शहर हे एक विकसित आदर्श शहर करावयाचे आहे हे लक्षात ठेवा विकासाचे तुंम्ही माझ्यावर सोडा असेही आ. सामंत यांनी सांगितले.
याप्रसंगी अविनाश लाड, विकास चाळके, शिल्पा मराठे, श्रृती ताम्हनकर, मजिद पन्हळेकर, अमित केतकर, सौरभ खडपे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या शुभारंभ प्रसंगी शहरातील बाळू चव्हाण व अजिज पठाण यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांचे आ. सामंत यांनी स्वागत केले.
याप्रसंगी अशफाक हाजू, दीपक नागले, प्रकाश कुवळेकर, एड. शशिकांत सुतार, भाजपाचे अनिल करंगुटकर आदींसह सर्व उमेदवार, शिवसेना भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.