जंगलात सापडली 43 हजार रुपयांची दारू

देवगड / प्रतिनिधी

कोटकामते आयतनवाडी येथील एका जंगलमय भागातील झोपडीत तब्बल ४३ हजार २०० रूपये किंमतीचा गोवा बनावटीचा अवैध दारुसाठा बेवारस स्थितीत रविवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास देवगड पोलिसांना आढळून आला. हा दारुसाठा पोलिसांनी जप्त केला असून अज्ञात संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई देवगडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे व कॉन्स्टेबल नितीन डोईफोडे यांनी केली. घटनेची फिर्याद नितीन डोईफोडे यांनी दिली असून या फिर्यादीनुसार अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार गणपती गावडे करीत आहेत. दरम्यान, यापूर्वीही देवगड पोलिसांना तालुक्यातील एका ठिकाणी अवैध दारुसाठा बेवारस स्थितीत सापडला होता. अवैध दारुसाठा बेवारस स्थितीत सापडण्याची ही दुसरी घटना आहे.