रिगल आयटीआयच्या वीजतंत्री विभागातील विद्यार्थ्यांनी दिली कण्हेर जलविद्युत प्रकल्पाला क्षेत्रभेट

रिगल आयटीआयच्या वीजतंत्री विभागातील विद्यार्थ्यांनी दिली कण्हेर जलविद्यत प्रकल्पाला क्षेत्रभेट 

चिपळूण : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल आयटीआय कोंढे चिपळूण येथील विजतंत्री (Electrician) विभागातील विद्यार्थ्यांनी शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सातारा येथील कण्हेर जलविद्युत प्रकल्पाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांसोबत आय.टी. आय. विभागाचे प्राचार्य अभिराज कबीर, प्राध्यापक समीर खोचरे उपस्थित होते.
यावेळी कण्हेर जलविद्युत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आर. जे. चव्हाण, सहाय्यक अभियंता सौ. स्वरदा पुजारी, सहाय्यक अभियंता अभिषेक खामकर आणि तंत्रज्ञ मनोज भोसले यांनी जलविद्युत गृहाची संपूर्ण माहिती तसेच विद्युत जनरेशन आणि वितरण कसे होते याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कण्हेर जलविद्युत प्रकल्प हे वेण्णा नदीवर असून त्याची स्थापित क्षमता ४ मेगावॅट आहे. तो मुख्यत्वे सिंचन आणि वीज निर्मितीसाठी उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प सातारा आणि सांगली जिल्ह्यांसाठी सिंचनाचे मुख्य साधन आहे. हे धरण मातीचा भराव व दगडी बांधकामाचे असून उंची ५८.५३ मीटर असून, त्यात १९ मीटर उंचीच्या जलप्रपातावरून वीज निर्माण केली जाते आणि जास्तीत जास्त विसर्ग १४.४४ क्यूमेक्स आहे. वीज निर्मितीच्या उद्दिष्टांव्यतिरिक्त, प्रकल्पाचे मुख्य लाभार्थी हे धरणामुळे प्रभावित होणारे पूरग्रस्त समुदाय आणि धरणातून पाणी आणि वीज सेवा मिळवणारे शेतकरी आहेत. या धरणाची साठवण क्षमता ४५६.५६ दशलक्ष घनमीटर असून, डावा कालवा, उजवा कालवा आणि आरफळ डावा कालवा यांसारख्या कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी पुरवले जाते. सदर विद्युत प्रकल्पामध्ये ६.६ के. व्ही. क्षमतेची विजनिर्मिती होते. टर्बाइन फिरविण्यासाठी लागणारे पाणी पेनस्टॉक मार्फत पाठविले जाते. कंट्रोल गेट, पेनस्टॉक, व्हील ऑपरेटींग सिस्टीमची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. ६.६ के. व्ही. विद्युतदाबाचे पुढे २२ के. व्ही. विद्युतदाबामध्ये रोहित्रामार्फत रुपांतर करून पुढे सातारा सबस्टेशनला वितरण केले जाते. याबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.
सदर क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आणि ज्ञानात भर पडली. रिगल आय.टी.आय. येथे वीजतंत्री विभागासोबतच सिव्हिल ड्राफ्टसमन, वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक), डिझेल मेकॅनिक, कॉम्प्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या विभागाच्या प्रशिक्षणाबरोबर औद्योगिक क्षेत्रभेटी घेतल्या जातात. येथे १०० टक्के अप्रेंटिसशिप आणि कॅम्पस इंटरव्हूद्वारे नामवंत कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध केली जाते. सुसज्ज कार्यशाळा व कॉम्प्युटर लॅब, अनुभवी शिक्षक वर्ग, भरपूर प्रॅक्टीकल्स, शासनाची शुल्क प्रतिपुर्ती योजना (शिष्यवृत्ती) सुविधा, आय.टी. आय. पास विद्यार्थ्यांना H.S.C. बोर्डाचे दोन विषयांची परीक्षा उत्तीर्ण झाल्यास इ. १२ वी समकक्षता सर्टिफिकेटची (Equivalent) सुविधा आहे. येथे प्रशिक्षण घेवून बाहेर पडलेले प्रशिक्षणार्थी देशातील व परदेशातील विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असून काही स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या व्यवसायात यशस्वी झाले आहेत.