गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या कीटकनाशक कंटेनरचा अपघात; महामार्ग दुपारी १ वाजता पूर्ववत!

हातखंबा येथे भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

रत्नागिरी: गोव्याहून मुंबईकडे कीटकनाशक घेऊन जाणाऱ्या एका मालवाहू कंटेनरला (टँकरला) आज मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. हा अपघात हातखंबा हायस्कूलजवळ सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, मात्र प्रशासनाच्या युद्धपातळीवरील प्रयत्नानंतर हा महामार्ग दुपारी १ वाजता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, MH ४३ BP ४६४६ या क्रमांकाचा कीटकनाशक टँकर गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जात होता. हातखंबाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर रस्त्यावर उलटला. अपघातामुळे महामार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह पोलीस पथक तातडीने हजर झाले होते. परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि प्रशासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही घटनास्थळी भेट दिली.
अपघातग्रस्त कीटकनाशकाचा टँकर तातडीने बाजूला हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. टँकर बाजूला केल्यावर रस्ता मोकळा करून दुपारी १ वाजता वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. वाहतूक ठप्प झाल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले होते.

या महामार्गावर अपघात होण्याची ही तीन महिन्यांतील तिसरी घटना असल्याने रस्ते सुरक्षा आणि वाहन चालकांकडून नियमांचे पालन करण्याच्या आवश्यकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.