नेमळे ग्रामपंचायतीकडून तीन बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण
पाणीटंचाईवर मात : शेतीला मिळणार मोठा आधार

नेमळे (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेमळे ग्रामपंचायतीने जलसंधारणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण व आदर्शवत पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तीन बंधाऱ्यांचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले असून, यामुळे गावकऱ्यांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे. पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी तसेच आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाय करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
*भूजल पातळी टिकणार उन्हाळी पिकांना फायदा*
या बंधाऱ्यांमुळे जमिनीतील पाण्याची पातळी (भूजल पातळी) टिकून राहण्यास मोठी मदत होणार आहे. विशेषतः बंधाऱ्यांच्या आजूबाजूला शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. पाणी अडल्यामुळे निर्माण होणाऱ्या ओलाव्याचा उपयोग करून शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेणे शक्य होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचे संधारण होऊन शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.
*पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
या कामाचा शुभारंभ आणि पूर्तता गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव, कृषी अधिकारी शारदा नाडेकर, शुभदा कविटकर, विस्तार अधिकारी संजय शेळके, एकनाथ सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. नेमळेच्या सरपंचा दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, ग्रामसेवक चौहान, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील रमेश नेमळेकर, नेमळे हायस्कूलचे शिक्षक राजेश गुडेकर, विद्यार्थी, नेमळे ग्रामस्थ, युवक तसेच बांधकाम कामगार यांनी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून तो यशस्वी करण्यास मोलाचे योगदान दिले.
*ग्रामपंचायतीचा दूरदृष्टीकोन*
यावेळी पदाधिकाऱ्यांनी नेमळे ग्रामपंचायतीचा जलसंवर्धनाबाबतचा दूरदृष्टी कोन अधोरेखित झाल्याचे सांगितले. गावच्या विकासासाठी जलसंधारण हा मूलभूत घटक असून, नेमळे ग्रामपंचायतीने घेतलेला हा उपक्रम अन्य ग्रामपंचायतींसाठी आदर्शवत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. तसेच, ग्रामपंचायतीकडून कार्यक्षेत्रात अजून काही ठिकाणी बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
नेमळे ग्रामपंचायतीचा हा यशस्वी उपक्रम ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ यशस्वी करण्याची दिशा दाखवणारा आणि ग्रामीण विकासाला गती देणारा ठरला आहे.











