आचरा नं1शाळेच्या मुलांनी नाटीकेतून दिला पाणी बचतीचा संदेश

शारदोत्सवातील ‘दुष्काळ’ नाटीका ठरली लक्षवेधी 

आचरा-अर्जुन बापर्डेकर

 

प्राथमिक शाळांमधील शारदोत्सव म्हणजे

लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमातू केवळ मनोरंजन एवढाच हेतू न राहता आता प्रबोधनही केले जाऊ लागले आहे.

येऊ घातलेल्या दुष्काळाची भयानकता वेळीच ओळखून केंद्र शाळा आचरेच्या तीसरीच्या मुलांनी सादर केलेल्या दुष्काळ नाटीकेतून उपस्थित सर्वाना सावध करत उपाययोजनांचा डोसही पाजला आहे.

 

केंद्र शाळा आचरे नं१च्या शारदोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमात ‘दुष्काळ’ या विषयावर आधारित नाटिका सादर करण्यात आली. या नाटिकेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या, दुष्काळामुळे करपलेली पिके, शेतकऱ्यांचे स्वप्न, मुला बाळाच्या शिक्षणाचा प्रश्न, रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, मुलांच्या इच्छा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, आदी गंभीर समस्यांना शेतकऱ्याला सामोरे जावं लागतं हे त्यांच्या अभिनयातून दाखवण्यात आलं.

 

पावसाअभावी निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना सहन करावा लागणारा त्रास, पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धावपळ आणि शेतीवर होणारे परिणाम विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून साकारले. पाण्याचा अपव्यय टाळावा, पावसाचे पाणी साठवावे, पाण्याचा एक एक थेंब किती महत्त्वाचा असतो हे विद्यार्थ्याने दाखवून दिले. पर्यावरणाचे संवर्धन करावे, हा संदेश नाटिकेतून देण्यात आला.

 

विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे उपस्थित प्रेक्षकांच्या मनाला ही नाटिका भावली. मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या या सादरीकरणाचे उपस्थितांनी कौतुक केले.येणा-या भयानतेतून वाचण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून, पाणी वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश या नाटिकेतून आपल्या अभिनयाने बालचमूने दिला.

“पाणी अडवा, पाणी जिरवा; दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवा!” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.यासाठी

.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.