ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर आणि ऑन्को लाईफकेअर ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम
चिपळूण (प्रतिनिधी):– भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कर्करोगाचं वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. याच अनुषंगाने ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर आणि ऑन्को लाईफकेअर ट्रस्ट यांच्या वतीने कोकणातल्या काही प्रमुख शहरांमध्ये कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. प्राची हरवंदे, डॉ. पुष्कर कुलकर्णी, सचिन पोकळे आणि रुग्णालयातले कर्मचारीही यामध्ये सहभागी झाले होते.
कोकणातल्या संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि दापोली तालुक्यामध्ये मिळून एकूण ३३ कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये एकूण १,३७७ जण सहभागी झाले होते. या पाच तालुक्यांमध्ये मिळून १,८९० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी मुखाच्या कर्करोगाच्या १,३७७ चाचण्या झाल्या असून स्तनाच्या कर्करोगाच्या ३१८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गर्भाशयाच्या कर्करोगाच्या एकूण १९५ चाचण्या घेण्यात आल्या.
या चाचण्यांमधून ३७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २२ जणांना मुखाचा कर्करोग असण्याची शक्यता नोंदवण्यात आली आहे. तर ६ महिलांना गर्भाशयाचा आणि ९ महिलांना स्तनाच्या कर्करोगाची शक्यता चाचण्यांमध्ये आढळून आली आहे.सध्या एका रुग्णाचे सर्व उपचार पूर्ण झाले असून एका रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत.










