काँग्रेसचे बंडखोर उमेदवार लियाकत शाह यांच्यासह तिघेजण सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित

चिपळूण (प्रतिनिधी):– चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह तिघांना काँग्रेसने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. ही कारवाई वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी केली आहे. या घटनेने काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ असलेले उमेदवार लियाकत शाह यांचा अर्ज अवैध ठरला. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातून काँग्रेसमध्ये आलेले माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर लियाकत शाह यांनी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

यानंतर काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी उत्तर रत्नागिरीतील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत या नाट्यमय घडामोडी संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या चिपळूण तालुका प्रभारी अध्यक्षपदी खेर्डी येथील प्रकाश साळवी तर चिपळूण प्रभारी शहराध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. तर गुरुवारी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह तुळशीराम पवार, राजेंद्र भुरण या तिघांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.

चिपळूण नगर परिषदेच्या निवडणूकमध्ये पक्षविरोधी कार्यवाही करीत आहात. आपले हे कृत्य पक्ष शिस्तीचा भंग करणारे असल्याने प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात येत आहे, असे वरिष्ठ उपाध्यक्ष एडवोकेट गणेश पाटील यांनी तिघांना पत्राद्वारे कळवले आहे. याची प्रत काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांना पाठवण्यात आली आहे. या कारवाईने काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.