चिपळूण (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील युवा कार्यकर्ते शुभम पिसे यांची भाजपा युवा मोर्चा चिपळूण शहराध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली. या निवडीबद्दल शुभम पिसे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शुभम पिसे हे माजी खासदार, विद्यमान आ. निलेश राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. पिसे यांचे राणे कुटूंबियांशी जवळचे सबंध आहेत. विशेष म्हणजे शुभम पिसे यांना सामाजिक, राजकीय क्षेत्राची आवड आहे. यातून त्यांचा मोठा मित्र परिवार देखील आहे. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे मंगळवार व बुधवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी जनता दरबारासह पक्ष प्रवेशाचा देखील मोठा कार्यक्रम झाला. तसेच वाशिष्ठी डेअरी प्रकल्प व चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेटी दिल्या. याचबरोबर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान भाजपा युवा कार्यकर्ते शुभम पिसे यांच्यावर भाजपा युवा मोर्चा चिपळूण शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, माजी नगरसेवक विजय चितळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या नव्या जबाबदारीबद्दल शुभम पिसे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्यासह भाजप नेते प्रशांत यादव, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी नगरसेवक परिमल भोसले तसेच भाजपा पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चिपळूण शहरात युवा संघटन मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे.










