पूर्णगड:
जि.प. शाळा पूर्णगड क्र.१, ता. जि. रत्नागिरी येथे ‘मिशन आपुलकी’ उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक उठावाला नवे बळ मिळाले आहे. शाळेच्या दर्शनी भागात आकर्षक डिजिटल बोर्डची स्थापना करण्यात आली असून हा बोर्ड सामाजिक कार्यकर्ते व शाळेचे माजी विद्यार्थी श्री. वासुदेव वाघे यांच्या सौजन्याने वस्तुरूप देणगी म्हणून प्राप्त झाला आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीशी शाळेचा परिसर सुसंगत व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
डिजिटल बोर्डमुळे शाळेचा परिसर केवळ सुंदर व आकर्षक झाला नाही, तर शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे सादर करण्यास मदत होणार आहे. ‘मिशन आपुलकी’च्या भावनेतून झालेल्या या देणगीमुळे शाळेच्या विकासाला महत्त्वाचे योगदान मिळाले आहे. या मौल्यवान सहकार्याबद्दल संपूर्ण शाळा परिवार व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने श्री. वाघे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.













