रत्नागिरी:
स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचे रक्षण आणि सागरी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मत्स्यव्यवसाय विभाग, रत्नागिरीने एक अत्यंत धाडसी आणि गोपनीय मोहीम राबवत दापोली तालुक्यातील अंजर्ले किनारपट्टीसमोर रायगड जिल्ह्यातील ‘एकवीरा दर्शन’ या एलईडी मासेमारी नौकेवर यशस्वी धडक कारवाई केली आहे. मध्यरात्रीच्या अंधारात, प्रतिकूल हवामान, समुद्रातील जोरदार वारे आणि उंच लाटांच्या आव्हानांवर मात करत पार पडलेल्या या विशेष मोहिमेला ‘ऑपरेशन निशाचर’ असे नाव देण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यात एलईडी दिव्यांचा वापर करून सुरू असलेल्या अवैध मासेमारीविरोधात मच्छीमारांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या, ज्यांची गांभीर्याने दखल घेत मत्स्यव्यवसाय विभागाने हा धडक प्रहार केला आहे.

या मोहिमेदरम्यान गस्ती नौकेची अडचण असतानाही मुंबई येथून पर्यायी गस्ती नौका उपलब्ध करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करण्यात आली. या मोहिमेत मुख्य कारवाई करताना पथकाने ‘एकवीरा दर्शन’ या नौकेला पकडलेच, शिवाय परिसरातील अन्य दोन रायगडच्या अवैध एलईडी नौका अंधाराचा व प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेऊन पसार होत असताना त्यांच्यावरील अवैध एलईडी दिव्यांचे नुकसान करण्यातही पथकाला मोठे यश आले. आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. भानुदास पालवे, अतिरिक्त आयुक्त श्री. महेश देवरे, सहआयुक्त श्री. नागनाथ भादुले आणि सहाय्यक आयुक्त श्री. जीवन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत परवाना अधिकारी श्री. चिन्मय जोशी, श्री. स्वप्नील चव्हाण, श्री. पार्थ तावडे, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक श्री. पुरुषोत्तम घवाळी आणि सागरी सुरक्षा रक्षक श्री. सचिन सुद यांनी अत्यंत सक्रिय सहभाग नोंदवला. विभागात मनुष्यबळाची कमतरता आणि अतिरिक्त कार्यभाराचे आव्हान असतानाही अधिकाऱ्यांनी दाखवलेली ही तत्परता आणि सागरी संपदेचे रक्षण करण्यासाठी विभाग पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.












