लांजा (प्रतिनिधी) – लांजा – कुवे संघटन पुरस्कृत अपक्ष उमेदवार पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन गुरुवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गावातील प्रमुख मानकऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रियांका संजय यादव यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
लांजा नगरपंचायत निवडणुकीत लांजा – कुवे संघटनच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासह एकूण १३ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रियांका संजय यादव या लांजा – कुवे संघटनच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत. बुधवारी सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर गुरुवारी त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी लांजा गावातील प्रमुख मानकरी, प्रतिष्ठित नागरिक, पॅनलचे सर्व उमेदवार तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी लांजा कुवे संघटनाचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना लांजा कुवे संघटन अपक्ष आघाडीचे नेते संजय यादव म्हणाले की लांजावासियांना अपेक्षित असलेला विकास आणि शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या साठी आपण अपक्षपणे निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. लांजावासियांना भेडसावणारा गंभीर प्रश्न म्हणजे डीपी प्लॅन आणि डम्पिंग ग्राउंड यासारखे प्रश्न हद्दपार करण्यासाठी लांजा कुवे संघटनाच्या माध्यमातून आपण रिंगणात उतरलो आहोत .जनतेचा देखील आपल्याला उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे. लांजा शहरातील जनता सुज्ञ आहे आणि या ठिकाणी प्रेमाने राहतो तोच जिंकतो. आणि आपले लांजा कुवे संघटन नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास देखील संजय यादव यांनी यावेळी व्यक्त केला










