संजय आंब्रे यांच्या ‘काटेरी तार’ प्रकल्पाला सतीश मोरे यांची भेट

चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील कुळवंडी (जांभूळगाव) येथील तिसंगी रोड परिसरात संजय आंब्रे यांनी उभारलेल्या ‘काटेरी तार’ प्रकल्पाला भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती जाणून घेत संजय आंब्रे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कुळवंडी जांभूळगाव परिसरात उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून संजय आंब्रे यांनी ‘काटेरी तार’ निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामागील संकल्पना, उत्पादन प्रक्रिया, आवश्यक कच्चा माल, प्रकल्पाची कार्यपद्धती तसेच भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने असलेल्या संधींबाबत सतीश मोरे यांनी आंब्रे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. स्थानिक पातळीवर उद्योग उभारून रोजगारनिर्मिती तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी यावेळी कौतुक केले. ग्रामीण भागातील तरुणांनी पारंपरिक रोजगाराच्या चौकटीबाहेर जाऊन उद्योग व व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी सतीश मोरे यांनी संजय आंब्रे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, “आपल्या या उपक्रमाच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत,” अशी ग्वाही दिली. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
या भेटीप्रसंगी भाजप खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, माजी सभापती विजय कदम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतीश मोरे यांच्या या भेटीमुळे संजय आंब्रे यांच्या प्रकल्पाला प्रोत्साहन मिळाले असून ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देणाऱ्या उपक्रमांची दखल घेतली जात असल्याचे यावेळी दिसून आले.