रत्नागिरी | प्रतिनिधी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासात १५ कोटी ठेव संकलनाचे उद्दिष्ट ठेव वृद्धीमासाचे दोन दिवस शिल्लक असतानाच पूर्ण झाले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिली.
ठेव वृद्धी मास हा वार्षिक उत्सव झाला आहे. या ठेव वृद्धी मासात ठेवीदारांच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मन चिंब झाले आहे. या प्रतिसादासमोर नतमस्तक व्हावे असे वाटते. विश्वासार्हतेची ही वार्षिक ठेव पावती म्हणजे १५ कोटींचा नवा ठेवसंचय असे वर्णन अवास्तव ठरणार नाही असे भावोद्गार ॲड.दीपक पटवर्धन यांनी काढले.
संस्थेच्या १७ ही शाखांमध्ये मोठा प्रतिसाद प्राप्त होत आहे. अजून दोन दिवस शिल्लक आहेत. या दोन दिवसात असाच भरभरून प्रतिसाद अपेक्षित आहे. आज १ कोटी ५० लाख १२ हजारांच्या नव्या ठेवी जमा झाल्या. १११२ इतक्या ठेव खात्यात ठेव जमा केली गेली. या प्रतिसादामुळे संस्थेच्या ठेवी २७६ कोटी ९२ लाखांच्या झाल्या आहेत. पावणे तीनशे कोटींचा ठेव टप्पा ठेव वृद्धी मास समाप्त होण्यापूर्वी संस्थेने गाठला आहे.
उर्वरित दोन दिवसात ठेवीदारांनी गुंतवणुकीची संधी साधत ठेव गुंतवणूक करावी असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.











