राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आरोप : आंदोलनाचा इशारा
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरात मंगळवारी सकाळपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेत पाणी तुंबले आहे. या तुंबलेल्या पाण्याला नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे असा आरोप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला असून येत्या दोन दिवसात सर्व नाले गटारे साफ करा अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा देखील दळवी यांनी यावेळी दिला.पावसाळ्यापूर्वी वारंवार नगरपालिकेला गटारे साफ करा अशी निवेदने देऊन देखील त्यांनी दखल न घेतल्याने आज बाजारपेठेत ही परिस्थिती उद्भवली आहे असा आरोप पुंडलिक दळवी यांनी केला आहे.
दरम्यान, शासनातर्फे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असताना देखील नगरपालिका प्रशासन मात्र सुशेगात असून कोणतीही उपायोजना करत नाही. त्यामुळे बाजारपेठेत ही परिस्थिती उद्भवली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.विठ्ठल मंदिर येथील गटारासमोर मोठ भगदाड पडल असून पावसाचे पाणी त्या खड्ड्यात जात असल्याने तो खड्डा दिसत नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी किंवा नागरीक त्यात पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तो देखील तात्काळ बुजवण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.










