रत्नागिरी जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: प्रशासकीय तयारी पूर्ण, उद्या मतदान

रत्नागिरी:
​रत्नागिरी जिल्ह्यात सात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या चार नगरपरिषदा तसेच देवरूख, लांजा आणि गुहागर या तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांचा रणधुमाळी शिगेला पोहोचला आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे.

मतदान केंद्रांची सज्जता आणि कर्मचारी नियुक्ती
​जिल्ह्यातील या सात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी २०० मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १२०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

​मतदानासाठी ईव्हीएम (EVM) मशीनचे वाटप सुरू झाले आहे. एकूण ४४१ ईव्हीएम मशीन मतदानासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

सर्वाधिक मतदान केंद्रे रत्नागिरी नगरपरिषदेत असणार आहेत, जिथे ६९ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

निवडणूक लढत आणि उमेदवारांची संख्या
​सात ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी आणि १४९ नगरसेवकांच्या जागांसाठी उद्या मतदान होणार आहे.
​निवडणुकीमुळे संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात उद्या (मंगळवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

प्रचार समाप्ती आणि राजकीय चुरस
​आज, सोमवारी रात्री १० वाजता निवडणुकीचा प्रचार थांबेल.
​रत्नागिरीतील शिवसेना-भाजप युती, चिपळूणमध्ये झालेली महाविकास आघाडीतील बिघाडी आणि काही ठिकाणी उभे राहिलेले अपक्ष उमेदवार यामुळे निवडणुकीची चुरस मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

रत्नागिरीतील एका प्रभागात निवडणूक स्थगित
​रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील निवडणूक निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे.
​या प्रभागातील मतदान आता २० डिसेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान उद्या होणाऱ्या ​मतदानाच्या दिवशी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.