खेड (प्रतिनिधी) : १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राणायामाने करण्यात आली. योगशिक्षिका करिष्मा कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यांनी उपस्थितांना योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगत योगाभ्यासाची प्रात्यक्षिके करून दाखवली तसेच उपस्थितांकडूनही ती करून घेतली.
यावेळी बोलताना करिष्मा कवळे यांनी योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैलीचा आधार असल्याचे सांगितले. योग दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा उपक्रम नसून योगाभ्यास हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दररोज किमान १५ मिनिटे योगासाठी दिल्यास त्याचे सकारात्मक परिणाम पुढील काळात निश्चितपणे अनुभवता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील आणि रजिस्ट्रार संदीप मुंनघाटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे सुपरिंटेंडंट दिलीप शेबेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. संस्कृत श्लोकाच्या पठणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.












