नगराध्यक्ष पदासाठी ६ तर २० नगरसेवक पदासाठी ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
मतमोजणी पुढे ढकलल्याने सर्वत्र नाराजी
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकिसाठी आज मंगळवार २ डिसेंबर रोजी सर्व ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १० हजार ११५ मतदारांपैकी ७५१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने एकूण ७४.२९ टक्के मतदान पार पडले. दरम्यान २०१६ च्या निवडणुकीमध्ये वेंगुर्ले नगर परिषदेच्या निवडणुकीत ७८% मतदान झाले होते. मात्र यावेळी मतदानाची टक्केवारी ४ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेले पंधरा दिवस सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविल्याने सर्वच उमेदवार विजयाची खात्री देत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी ६ तर २० नगरसेवक पदासाठी तब्बल ८३ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी आज मतपेटीत बंद केले. उद्या ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी २१ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनीही आज दुपारी वेंगुर्ले शहरात भेट देत मतदानाचा आढावा घेतला.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, सहाय्यक निवडणुक अधिकारी हेमंत किरूळकर यांनी आजच्या मतदान प्रक्रियेचे १६ मतदान केंद्रांवर व्यवस्थित नियोजन केले होते. या नियोजनामुळे मतदान सुरळीतपणे पार पडले. शहरात १६ मतदान केंद्रांवर नगराध्यक्ष आणि अ भागातील नगरसेवकांना व ब भागातील नगरसेवकांना मतदान करण्यासाठी प्रत्येकी दोन मशिन याप्रमाणे एकूण ३२ मशिन ठेवण्यात आल्या होत्या. तर प्रभागनिहाय १० राखीव व दोन स्पेशल राखीव अशा मशिन निवडणुकीसाठी कार्यरत ठेवण्यात आल्या होत्या.
सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांची गर्दी
सर्व प्रभागांमध्ये सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांची गर्दी दिसत होती. सकाळी ७.३० ते ९.३० या वेळात १०.५१ टक्के मतदान झाले. चार तासा नंतर ११.३० वाजे पर्यंत २५.१९% सहा तासानंतर दुपारी १.३० वाजे पर्यंत ४१.९७ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३.३० वाजे पर्यंत ५७.८० टक्के मतदान आणि सायंकाळी ५.३० वाजे पर्यंत एकूण १०११५ मतदारांपैकी ३७०४ पुरुष आणि ३८१० महिला मिळून ७५१४ (७४.२९ टक्के) मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानामध्ये महिलांची संख्या जास्त आहे.












