शांततेत पार पडली नगरपंचायत निवडणूक
कणकवली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीसाठी निवडणूक अखेर किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. विशेष म्हणजे या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले असून मतदारांनी चुरशीने मतदानाचा हक्क बजावत मतदानाची टक्केवारी 79.71% टक्के पर्यंत पोहोचवली आहे.
कणकवली हा संवेदशील भाग म्हणून ओळखला जात होता. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने कणकवलीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपचे समीर नलावडे, शहर विकास आघाडीचे संदेश पारकर व लोकराज्य जनता पार्टीचे गणेशप्रसाद पारकर या तीन उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. तर नगरसेवकपदाच्या ३६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला रविवार २१ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळी ७:३० वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रा मतदारांचा मतदानासाठी उत्साह दिसून येत होता. सकाळी ९:३० वा. १५:८४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी ११:३० वाजेपर्यंत ३४:७२% टक्के मतदान झाले. १:३० वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी ५२:८८% टक्के पर्यंत पोहोचली होती. सायंकाळी ३:३० वाजेपर्यंत ६७:३२% टक्के झाली. ५:३० वाजेपर्यंत ही आकडेवारी ७९:७१% टक्के पर्यंत पोहोचली. विशेष ३:३० वाजल्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली.
मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रांवरून मतदान यंत्रे तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांनी जमा केली. यंत्रे स्टॉग रुममध्ये ठेवण्यात आली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी गौरी पाटील यांनी ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केल्याचे दिसून आले.
कडक पोलीस बंदोबस्त
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ८ पोलीस अधिकारी, ८६ पोलीस कर्मचारी, ६८ होमगार्ड अशाप्रकारे 1१६२ कर्मचारी तैनात होते.
त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे, पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे यांच्यासह पोलीस यंत्रणा कार्यरत होती. मात्र, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला.
कणकवली न. प. निवडणुकीसाठी सकाळी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी प्रभाग ५ व ८ प्रभाग मध्ये मशीनमध्ये किरकोळ स्वरुपात बिघाड झाला. एक ठिकाणी कंट्रोल युनिट बिघाड अन्य ठिकाणी बॅलेट मशीनचे बटन दाबत नसल्याचा प्रकार पुढे आल्याने या मशीन बदलण्यात आल्या. अन्य कुठेही मशीनअभावी गैरसोय झाली नाही.
राजकीय पदाधिकाऱ्यांची भेट
कणकवली न. पं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांबाहेर लावलेल्या मतदान बूथला भेट कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी कणकवली शहरातील सर्वच बथूला भेट दिल्या. त्याचप्रमाणे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भेटी दिल्या.
नववधूने केले मतदान
विशेष म्हणजे न. पं. निवडणुकीच्या निमित्ताने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचे पवित्र कार्य करण्याचे कणकवली येथील श्रद्धा परब हातावर मेहदींचा रंग, कंपाळावर कुंकू, अंगावर लग्नाचा पोषाख घालून कणकवली विद्यामंदिर मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्याबद्दल तिचे कौतुक होत होते.
राजकीय खेळीमेळीत निवडणूक
कणकवली नगरपंचायतीची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात प्रथमच पार पडल्याचे चित्र होते. सुरुवातीला पालकमंत्री नितेश राणे यांनी माजी आमदार राजन तेली, सतीश सावंत, संजय आग्रे हस्तांदोलन करत निवडणूक वेगळी आणि राजकीय संबंध वेगळे प्रचिती दिली. त्यामुळे ही निवडणूक शांततेत पार पडल्याचे याची खात्री झाली होती.














