कणकवली | प्रतिनिधी :खासदार नारायण राणे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीवरून श्री. संदीप साटम यांची कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी ‘मुख्यमंत्री बळीराज शेत/पाणंद रस्ते योजना’ सहअध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना संदीप साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेत काम करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री तसेच सर्व प्रमुख नेत्यांचे आभार मानले.
ते म्हणाले, “या योजनेच्या माध्यमातून शासन, शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधून सर्वसामान्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत दर्जेदार पाणंद रस्ते पोहोचावेत आणि त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.”
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला या महत्त्वाच्या पदावर संधी मिळाल्याने कणकवली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.













