खेड (प्रतिनिधी) : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त खेड तालुक्यात दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन देण्यात आले. विविध विभागातील अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करत दिव्यांग बांधवांच्या मूलभूत हक्कांविषयी जागृती आणि अंमलबजावणीसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
या निवेदनावेळी सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, उत्तमकुमार जैन, भूषण काणे, स्नेहज्योती अंध विद्यालयाचे शाळा समिती सचिव संदीप सुखदरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींना समान संधी, सन्मान आणि सुलभ सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी असून त्यासाठी आवश्यक सर्व मागण्या निवेदनातून अधोरेखित करण्यात आल्या. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी नगरपरिषदेमार्फत दिव्यांगांसाठी प्रस्तावित सानुग्रह अनुदानाची माहिती देत सकारात्मक भूमिका मांडली. कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेशद्वारे, रॅम्प, ब्रेल साईनज, स्वतंत्र स्वच्छतागृहे, तक्रार निवारणासाठी सुलभ यंत्रणा, कर्मचाऱ्यांसाठी संवेदनशीलता प्रशिक्षण तसेच दिव्यांग प्रमाणपत्र आणि सुविधा प्रक्रियांच्या गतीकरणाची गरज यावर भर देण्यात आला. अनुज जोशी यांनी दिव्यांग बांधवांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण हे शासन आणि प्रशासनाचे मूलभूत कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. शासकीय सेवांमध्ये कोणताही भेदभाव न होता दिव्यांग नागरिकांना सन्मानपूर्वक आणि योग्य मार्गदर्शनासह सेवा देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. समावेशक आणि न्याय्य समाजासाठी दिव्यांग हक्कांचे रक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने व्यक्त केले. संबंधित विभागांनी तातडीने कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी सुरू करावी, अशी सामूहिक मागणीही यावेळी करण्यात आली.













