महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत वेताळ प्रतिष्ठान, चे “सूनबाई तोऱ्यात” नाटक प्रथम..

मालवण चे “वाट चुकलो देवा” द्वितीय तर दाभोली- वेंगुर्ले चे “मेला तो शेवटचा होता” तृतीय

सिंधुदुर्ग केंद्राचा निकाल : प्राथमिक फेरीत तब्बल १७ नाटके झाली सादर

प्रथम दोन नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड…

वेंगुर्ले : दाजी नाईक
६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून वेताळ प्रतिष्ठान, सिंधूदुर्ग तुळस या संस्थेच्या “सूनबाई तोऱ्यात” या नाटकाला प्राथमिक फेरीत प्रथम पारितोषिका तसेच श्री राधाकृष्ण देवस्थान, मालवण या संस्थेच्या “वाट चुकलो देवा” या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. विभीषण चवरे यांनी आज प्रसिध्दी पत्रकाद्वारे आज केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण व नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृह, वेंगुर्ला येथे अतिशय जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे केंद्रावरील अन्य निकालांमध्ये इंद्रधनु कलामंच, दाभोली- वेंगुर्ले या संस्थेच्या “मेला तो शेवटचा होता” या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक राजेश गोवेकर (नाटक-सूनबाई तोऱ्यात), द्वितीय पारितोषिक नंदकुमार तळवडेकर (नाटक वाट चुकलो देवा), तृतीय पारितोषिक सिध्देश सावंत (नाटक मेला तो शेवटचा होता) प्रकाश योजना प्रथम पारितोषिक : यश मांजरेकर (नाटक सूनबाई तोऱ्यात), द्वितीय पारितोषिक गौरव राऊळ (नाटक-अथांग), तृतीय पारितोषिक सोहम ठाकूर (नाटक-संदूक) नेपथ्य प्रथम पारितोषिक :अर्जुन हळदणकर (नाटक- सुनबाई तोऱ्यात , द्वितीय पारितोषिक निदेश कुमठेकर (नाटक-वाट चुकलो देवा), तृतीय पारितोषिक साईश नाईक (नाटक अथांग) रंगभूषा प्रथम पारितोषिक ; गोपाळ चेंदवणकर (नाटक-सुनबाई तोऱ्यात), द्वितीय पारितोषिक भरत मेस्त्री (नाटक-अखेरचा सवाल), तृतीय पारितोषिक पराग कुबल (नाटक-वाट चुकलो देवा) संगीत दिग्दर्शन प्रथम पारितोषिक : जय तळवडेकर (नाटक वाट चुकलो देवा), द्वितीय पारितोषिक शांताराम कवठणकर (नाटक येरे येरे पावसा), तृतीय पारितोषिक अक्षय घांगट (नाटक-जिथून पडल्या गाठी) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सत्येंद्र नाथम (नाटक बायको शिवाय काय खरा नाय व समीक्षा फड़के (नाटक- अखेरचा सवाल), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे सतिश खवणेकर (नाटक वाट चूकलो देवा), संजय नागडे (नाटक-मोला तो शेवटचा होता), दत्ताराम गोवेकर (नाटक सूनबाई तोऱ्यात), प्रा. प्रदिप होडावडेकर (नाटक-बॅलन्सशिट), वैभवी सोकटे-परुळेकर (नाटक- मेला तो शेवटचा होता, ईशा माळकर (नाटक- येरे येरे पावसा), हर्षदा बागायतकर (नाटक-भटाची बायपास), विधी नाईक (नाटक-सुनबाई तोऱ्यात) यांचा समावेश आहे. सिंधुदुर्गातील या सर्व नाटकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्थसाठी परीक्षक म्हणून श्री. सुरेंद्र केतकर, श्री. विजय कोलवणकर आणि श्रीमती सुजाता गोडसे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि कलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. भविष्यातही संस्था व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केलीली आहे.