बांदा ओटवणे मार्गावर ३६ हजारांच्या दारूसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई : दोघांविरोधात गुन्हा दाखल 

 

सावंतवाडी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विलवडे -बांदा -ओटवणे मार्गावर केलेल्या कारवाईत गोवा बनावटीची ३६ हजार रुपये किमतीची दारू आणि दोन मोटारसायकली असा एकूण २ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत निवेल बावतीस बारदेसकर (वय ३९, रा. कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) आणि विठ्ठल गोविंद पाटील (वय ३५, रा. कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, सद्या रा. सोहाळे, ता. आजरा) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिनांक १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी विलवडे, बांदा-ओटवणे मार्गावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी १,७०,००० रुपये किमतीच्या ‘ॲक्सेस 225’ आणि ‘टीव्हीएस ज्युपिटर’ या दोन मोटारसायकली आणि ३६ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू असा एकूण २ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या निर्देशानुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड आणि पोलीस अंमलदार अमर कांडर यांनी ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली. पुढील तपास बांदा पोलीस करत आहेत.