देवगड / प्रतिनिधी
देवगड–नांदगाव महामार्गावरील हडपीड येथील कुलस्वामिनी मंदिरासमोरील अवघड वळणावर दुचाकीने रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार विनायक धोंडू पुजारे (वय २२, रा. कोटकामते आडिवरेवाडी) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहप्रवासी निखिल नारायण नवलू (वय २४, रा. कोटकामते आडिवरेवाडी) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर गोवा–बांबुळी येथे उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी मध्यरात्री १.१५ च्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळोशी वरचीवाडी येथील रिक्षाचालक बाळकृष्ण नागोजी खरात हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०७ एएच २५३७) घेऊन देवगड येथून कोळोशीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी कोटकामते आडिवरेवाडी येथील विनायक पुजारे हा निखिल नवलू याच्यासह आपल्या दुचाकीवरून नांदगावहून कोटकामतेकडे येत होता. हडपीड येथील कुलस्वामिनी मंदिराजवळील अवघड वळणावर भरधाव वेगामुळे विनायक पुजारे याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध बाजूस जाऊन समोरून येणाऱ्या बाळकृष्ण खरात यांच्या रिक्षावर आदळली.
धडक इतकी भीषण होती की विनायक पुजारे जागीच ठार झाला. तर मागील सीटवर बसलेला निखिल नवलू गंभीर जखमी झाला. रिक्षाचालक बाळकृष्ण खरात यांना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून गंभीर अवस्थेतील निखिल नवलू याला उपचारासाठी हलविले. त्याच्यावर सध्या गोवा–बांबुळी येथे उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस हवालदार गणपती गावडे आणि योगेश महाले यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गुरुवारी सकाळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात विनायक पुजारे यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी रिक्षाचालक बाळकृष्ण खरात यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.












