राजापूर (वार्ताहर): ग्लोबल कोकण आणि कोकण क्लबच्या वतीने येथील माय राजापूर या संस्थेचे संस्थापक व वास्तुविशारद जगदीश पवार- ठोसर यांना कोकण आयडॉल पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या सोहळयात तंजावर येथील छ. शिवाजी महाराज यांचे वंशज श्रीमंत बाबाजी राजे भोसले यांच्या हस्ते श्री. पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाची सरकारी नोकरी सोडून राजापूर तालुक्याच्या विकासासाठी ध्यास असलेली ‘माय राजापूर’ संस्था स्थापन केली. संपूर्ण राजापूरमधील पर्यटन स्थळांचा अभ्यास करून राजापूर तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार केला आणि तो प्रत्यक्ष राबविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. राजापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांची माहिती देणारी myrajapur. in वेबसाईट तयार केली. राजापूर पर्यटनाचा ब्रँड विकसीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मुंबई कोकण चौपदरी हायवे राजापूरात धोकादायक वळणे तशीच ठेवून करण्यात येणार होता, हा धोका टाळण्यासाठी पर्यायी महामार्गाचा आराखडा तयार करून सर्वसामान्य माणसांना सोबत घेऊन महामार्ग सुरक्षित करण्यासाठी आंदोलन उभे केले. पर्यायी महामार्गाचा आराखडा माननीय नितीन गडकरींच्या मंत्रालयाला पटवून देऊन हायवेच्या नवीन मार्गाला मंजुरी मिळवून घेतली. सध्या अर्जुना नदीवर उंच पूल बांधून धोकादायक वळणे कमी करून रस्ता बांधण्यात आला आहे. भविष्यातील शेकडो लोकांचे अपघातामुळे जाणारे प्राण वाचविले आहेत. आपल्या तालुक्याच्या आणि परिसराच्या विकासासाठी झपाटलेले व्यक्तिमत्त्व म्हणून कोकण आयडॉल हा सन्मान देण्यात आला आहे.
त्यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटो-जगदीश पवार-ठोसर












