खेड : तालुक्यातील तळे विभाग तसेच चंदणवाडी परिसरातील ऊबाठा शिवसेना पक्षातील अनेक कार्यकर्ते आता शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. गुरुवार, 21 ऑगस्ट रोजी भरणे येथील हॉटेल बिसु येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
या प्रसंगी शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास कदम, शिवसेना उपनेते संजय कदम आणि जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रवेश करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. यावेळी रामदास कदम यांनी या कार्यक्रमात बोलताना नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत केले आणि त्यांना खेड तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच खेड तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेचा झेंडा फडकविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यातील तळे विभाग आणि चंदणवाडी परिसरात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार असून आगामी राजकीय समीकरणांमध्ये हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.













