राजापूर | प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील मौजे मजरे जुवे (भालावली) येथे दिनांक ०६/१२/२०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुचकुंदी नदीच्या किनाऱ्यालगत एक बिबट वन्यप्राणी मृत अवस्थेत आढळल्याची माहिती सोशल मीडियावरून प्राप्त झाली. ही बातमी मिळताच वनपाल, राजापूर यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पाहणी करता, सदर बिबट हा कुजलेल्या अवस्थेत असल्याचे आढळले. सदर घटनेबाबत विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी-चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने गुन्हा नोंद केला असून, आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत.
वन विभागाने मृत बिबट्यास ताब्यात घेतले आहे. उद्या सकाळी पशुधन विकास अधिकारी, राजापूर यांचेकडून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. सदर घटनेचा पुढील तपास सहायक वनसंरक्षक, रत्नागिरी आणि वन परिक्षेत्र अधिकारी हे करत आहेत.
यावेळी विभागीय वन अधिकारी, चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.











