कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून लवकरच सिंधुदुर्ग साहित्यिकांचे संमेलन

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार व पालकमंत्री नितेश राणे राहणार उपस्थित

​कुडाळ येथे कोमसाप सिंधुदुर्ग व कुडाळ शाखेचे ‘भाकरी आणि फुल’ कवी संमेलन आणि कार्यकर्ता मेळावा उत्साहात
​
कुडाळ । प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सिंधुदुर्ग, साहित्यिक चळवळ प्रभावीपणे पुढे नेत असून अशा संमेलनांच्या माध्यमातून नवनवीन साहित्यिक घडविण्याचे कार्य होत आहे, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे उद्घाटक रणजित देसाई यांनी काढले.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० हून अधिक साहित्यिक घडले असून, ज्या साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत, त्यांचे साहित्यिक संमेलन कोमसापच्या माध्यमातून येत्या जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. या साहित्यिक संमेलनाच्या आयोजनाची सर्वतोपरी जबाबदारी स्वीकारण्याचे आश्वासन रणजित देसाई यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात अशा प्रकारचे हे पहिलेच लेखक-कवी साहित्यिक संमेलन भरविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
​कुडाळ येथील श्री संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात कोमसाप सिंधुदुर्ग व कुडाळ शाखेच्या संयुक्त विद्यमाने कार्यकर्ता मेळावा व “भाकरी आणि फुल” जिल्हास्तरीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. रणजित देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.


​साहित्यिक विचार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे: रणजित देसाई
​यावेळी बोलताना देसाई यांनी, साहित्यिकांचे विचार सर्वप्रथम शालेय मुलांपर्यंत पोहोचले पाहिजेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांनी कोमसापसोबत संयुक्त उपक्रम राबवून मुलांमध्ये साहित्यिक विचार रुजविण्यासाठी एकत्रित काम करावे. यासाठी तशा सूचना आपण जिल्हा परिषद शिक्षण विभागाला करणार असल्याचे सांगितले. कोमसापच्या कार्यकर्ता मेळावा व कवी संमेलनाच्या एकत्रित आयोजनाबद्दल त्यांनी कोमसाप जिल्हा व कुडाळ शाखेचे विशेष कौतुक केले.

​पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा गौरव
​उद्घाटनपर कार्यक्रमात कोमसाप सिंधुदुर्गकडून विविध पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यात प्रामुख्याने मालवणी कवी रुजारियो पिंटो (कोमसाप राजधानी पुरस्कार प्राप्त), सुरेश ठाकूर (मालवण शाखाध्यक्ष, बीज अंकुरे अंकुरेचे संपादक), लेखिका वैशाली पंडित, कादंबरीकार वृंदा कांबळी, ना. बा. रणसिंग, कोमसाप प्रांत विभागाचे समन्वयक अनंत वैद्य, कोमसाप बांधकाम समितीचे सदस्य संदीप वालावलकर आदींचा समावेश आहे.

​सत्काराला उत्तर देताना श्री. अनंत वैद्य यांनी साहित्याच्या जोडीला शालेय स्तरावर मुलांमध्ये मोबाईलची आवड कमी करून साहित्याकडे त्यांचा कल वाढावा यासाठी तरुण पिढी व शालेय विद्यार्थी यांना केंद्रबिंदू ठेवून शाळांबरोबर संयुक्त उपक्रम राबविण्याची सूचना केली. कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश मसके यांनी कोमसापच्या कार्याचा आढावा घेऊन, कोकणात साहित्यिक चळवळ पुढे नेत असल्याचे व कार्यकर्ता मेळावा व कवी संमेलनाच्या माध्यमातून नवनवीन साहित्यिकांना व्यासपीठ देण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले.

​कवी संमेलनात विविध कवींची रंगत
​कोमसाप आयोजित ‘भाकरी आणि फुल’ कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी रुजारियो पिंटो होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुडाळ शाखाध्यक्ष प्राध्यापक संतोष वालावलकर यांनी केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहल फणसळकर यांनी केले, तर आभार तालुका सहसचिव संदीप साळसकर यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमाचे आभार जिल्हा सहसचिव सुरेश पवार यांनी मानले.

​कवी संमेलनात विठ्ठल कदम, रामदास पारकर, प्रज्ञा मातोंडकर, ॲड. नकुल पार्सेकर, ऋतुजा सावंत भोसले, दीपक पटेकर, मधुरा वझे, श्रावणी प्रभू, अर्चना जोशी, राजस रेगे, मंगेश बागवे, सानिका पालव, वैशाली पंडित, भरत ठाकूर, सुरेश पवार, स्वाती सावंत, साईप्रसाद वेंगुर्लेकर, गोविंद पवार, राजेंद्र गोसावी, प्रगती पाताडे, मनोहर सरमळकर, सुष्मिता राणे, स्नेहल फणसळकर या कवींनी आपल्या कविता सादर करून संमेलनात रंग भरली.