मारहाणीत गणेश राणे जखमी
मोंड भैराई देवी मंदिरातील घटना
मंदिर ट्रस्ट अध्यक्ष व विश्वस्त अशा चौघांवर गुन्हा दाखल
देवगड : प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील मोंड भैराई मंदिर येथे शनिवारी सायंकाळी मंदिर ट्रस्ट, ग्रामस्थ आणि मानकरी यांच्या आयोजित बैठकीत ग्रामस्थ तसेच माजी जि.प. सदस्य गणेश राणे यांनी ट्रस्टकडे अधिकाराबाबत विचारणा केली. याचा राग मनात धरून ट्रस्टकडून गणेश राणे यांना जबर मारहाण करण्यात आली तसेच त्यांना मंदिराबाहेर ओढत नेण्यात आले. ही घटना शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता घडली. याबाबत गणेश राणे यांच्या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष शैलेंद्र राणे आणि तीन विश्वस्त अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. मोंड भैराई देवी मंदिरात ट्रस्ट विश्वस्त, मानकरी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक सुरू होती. बैठकीदरम्यान गणेश राणे यांनी ट्रस्टकडे अधिकारांविषयी विचारणा केली. यामुळे संतापलेल्या ट्रस्ट सदस्यांनी गणेश राणे यांच्याशी वाद घातला. वादाच्या दरम्यान अध्यक्ष शैलेंद्र मधुसूदन राणे (५५), विश्वस्त शशांक मधुसूदन राणे (५२), अनिल प्रभाकर राणे (५६) आणि उपेंद्र सुधाकर राणे (४८), सर्व रा. मोंड राणेवाडी, यांनी संगनमत करून गणेश राणे यांना शिवीगाळ केली व मारून टाकण्याची धमकी दिली.
यातील अध्यक्ष शैलेंद्र राणे यांनी हाताने गणेश राणे यांच्या तोंडावर व नाकावर प्रहार करून त्यांना जखमी केले. उपेंद्र राणे यांनी त्यांच्या डाव्या हाताला अंगठ्याजवळ पिरगळले, तर शशांक राणे आणि अनिल राणे यांनी त्यांना मंदिरातून ओढत बाहेर नेऊन खाली पाडले. या घटनेनंतर गणेश राणे यांनी देवगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अध्यक्ष शैलेंद्र मधुसूदन राणे, विश्वस्त शशांक मधुसूदन राणे, अनिल प्रभाकर राणे आणि उपेंद्र सुधाकर राणे या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२), (३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार आशिष कदम करीत आहेत.












