पार्थीवावर रेडी कनयाळ येथे आज अंत्यसंस्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी : गोव्यातील एका क्लबला लागलेल्या भीषण आगीत दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलेल्या २५ जणांमध्ये मूळचे सावंतवाडी तालुक्यातील देवसू येथील रहिवासी डॉम्निक डिसोजा (वय ४०) यांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे
देवसू गावावर शोककळा पसरली आहे.
डॉम्निक डिसोजा हे कामानिमित्त गोव्यात स्थायिक झाले होते आणि ते ज्या क्लबमध्ये ही दुर्घटना घडली, त्याच क्लबमध्ये वेटर म्हणून कार्यरत होते. क्लबला आग लागल्यानंतर किचनमध्ये गुदमरल्यामुळे त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
डॉम्निक डिसोजा यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगा असे कुटुंबीय आहे.
त्यांचे काही वर्षांपूर्वी रेडी कनयाळ गावामध्ये स्थायिक झालेले भाऊ सावंतवाडीमध्ये राहत असून त्यांनी ही बातमी मिळाल्यावर तातडीने गोव्याकडे धाव घेतली. शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे डॉम्निक यांचे देवसू गावातील प्रत्येक घरात सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच गावातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत.
डॉम्निक डिसोजा यांच्या पार्थिवावर आज सोमवारी दुपारी कनयाळ येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.












