ए. एच. ए. – कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,चिपळूणच्या प्रा.ललित काशिनाथ  कांडवेलकर यांना मुंबई विद्यापीठामार्फत डॉक्टररेट प्रदान

चिपळूण :
ए. एच. ए. – कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, चिपळूण या ठिकाणी कार्यरत असलेले तसेच आकार एज्युकेशनल ट्रस्ट चे उपाध्यक्ष मा. ललित काशिनाथ कांडवेलकर यांना नुकतीच मुंबई विद्यापीठामार्फत पी.एच.डी. म्हणजेच डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली. कोकणामध्ये सातत्याने आपत्ती विशेषतः पूर, भूकंप तसेच इतर नैसर्गिक आपत्ती या कायमस्वरूपी येत असतात आणि त्यांचा खूप मोठा नकारात्मक परिणाम हा कोकणातील व्यवसायांवर होत असतो तसाच त्याचा नकारात्मक परिणाम हा हॉटेल व्यवसायावर सुद्धा होत असतो. येणाऱ्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती पासून हॉटेल व्यावसायिकांनी स्वतःचे कसे संरक्षण करायला हवे हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून डॉ. ललित काशिनाथ कांडवेलकर यांनी त्यांचा प्रबंध “अ स्टडी ऑफ द इफेक्ट्स अँड चॅलेंजेस ऑफ डिझास्टर ऑन हॉटेल इंडस्ट्री अँड इट्स स्टेक होल्डर” या विषयावर सादर केला.
सदर प्रबंध डॉ. ललित यांनी प्रो. डॉ. कांचन फुलमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीन वर्षांमध्ये पूर्ण करून विद्यापीठात सादर केला होता. हॉटेल इंडस्ट्री आपत्ती व्यवस्थापना संदर्भात सादर केलेला प्रबंध हा कोकणातील पहिला प्रबंध ठरला असून त्याचा निश्चितपणे कायदा हा कोकणातील हॉटेल व्यवसायिकांना, हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयांना, पर्यटकांना, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना तसेच हॉटेलला वेगवेगळ्या वस्तू पुरवणाऱ्यांना सुद्धा होणार आहे. सदर सादर केलेल्या प्रबंधामधील मॉडेलचे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न चालू असून लवकरच त्याचे पेटंट मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असे डॉ. ललित यांनी सांगितले. महाविद्यालयात डॉ. ललित यांचे अति उत्साहात आणि फटाक्यांच्या आतिशबाजी मध्ये स्वागत करण्यात आले. सदर विद्यार्थ्यांचे स्वागत हे भारावून टाकणारे असून खऱ्या अर्थाने अशा गोष्टींनी समाजासाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा मला मिळते असे उद्गार डॉ.ललित यांनी काढले. ए एच ए – कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये नुकताच या संदर्भात कार्यक्रम घेण्यात आला त्या प्रसंगी कोकणामध्ये जेवढे हॉटेल मॅनेजमेंटचे महाविद्यालये आहेत त्यामध्ये डॉक्टर ललित हे पहिले हॉटेल मॅनेजमेंट विषयातील पी.एच.डी./ डॉक्टरेट असलेले प्राध्यापक ठरले आहेत आणि ही एक आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब असून त्याचा नक्कीच फायदा महाविद्यालय व विद्यार्थ्यांना होणार असल्याचे प्राचार्या सौ. रोहिणी ओतारी यांनी मनोगत व्यक्त करताना नमूद केले. सदर कार्यक्रमावेळी प्रा. सुमित वासनीक, प्रा. रोहन सोमन, प्रा. प्रणाली घडशी, प्रा. संजय जाधव व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.