चिपळूणमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा

चिपळूण (प्रतिनिधी) : अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा चिपळूणतर्फे विविध सांस्कृतिक व नाट्यविषयक उपक्रम राबवले जातात. यावर्षी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन रविवार दि. ४ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
एकपात्री अभिनयासाठी ४ ते ६ मिनिटे तर द्विपात्री अभिनयासाठी ५ ते ७ मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पारितोषिकांमध्ये एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक १ हजार, द्वितीय ७०० तर तृतीय ५०० असेल. द्विपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक १,५०० रूपये, द्वितीय १,००० तर तृतीय क्रमांक ७०० पारितोषिक देण्यात येईल. चिपळूण शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.