वहाळ गावातून व्यक्त होते हळहळ
चिपळूण (वार्ताहर ):
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई विभागीय शाखा वरळीचे अध्यक्ष आणि चिपळूण वहाळ गावचे सुपुत्र चंद्रकांत निर्मळ यांचे दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आकस्मिक निधन झाले. शनिवारी सायंकाळी मुंबई शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चिपळूण तालुक्यातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे श्री निर्मळ होते. गाव आणि मुंबईत दोन्ही ठिकाणी ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांच्या जाण्याने समाजाची, पर्यायी चिपळूण तालुक्याची कधीही भरून न निघणारी अपरिरिमीत हानी झाली आहे. अतिशय हुशार, नेहमीच हसतमुख चेहरा, शांत आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा स्वभाव, असे हे उच्च शिक्षित नेतृत्व अचानक निघून गेल्याने समाज बांधवांकडून हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना चिपळूण शाखेच्या वतीने कुणबी मानबिंदू पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तो कार्यक्रम त्यांचा अखेरचा ठरला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.











