प्रसिद्ध ज्येष्ठ ध्वनिमुद्रक अनंत बाईत यांचा स्वरध्वनी पुरस्काराने गौरव

संगीत क्षेत्रात केलेल्या कामाची पोच पावती

चिपळूण : कलगीतुरा समाज उन्नत मंडळ मुंबई यांच्या वतीने लता मंगेशकर नाट्यगृह मीरा रोड येथे आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात ध्वनिमुद्रण क्षेत्रातील एक आघाडीचे नाव असलेले अनंत धोंडू बाईत यांचा स्वरध्वनी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संगीत ही आत्म्याची अमृतधारा आहे. आणि त्यातील प्रत्येक सुर आपल्या मनाला गारुड घालतो. रेकॉर्डिंग स्टुडिओच्या माध्यमातून संगीताची सुंदरता जतन करणे, नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करणे यासाठी अथक प्रयत्न करणारे प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणजे अनंत बाईत होय.

सध्या व्यवसायानिमित्त मुंबई भांडुप येथे वास्तव्य करीत असलेले परंतु मूळ गाव संगमेश्वर किरडुबे गावचे ते सुपुत्र आहेत. अनंत बाईत यांचा अरविंद साऊंड स्टुडीओ हा खिंडी पाडा, भांडुप येथे आहे. त्यांनी अथक परिश्रम घेत हा रेकॉर्डिंग स्टुडिओ निर्माण केला आहे.
मुंबईत राहून नोकरी करुन श्री. बाईत यांचे मन रमत नव्हते. त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न यातून कुटुंबाच्या गरजा भागत नव्हत्या.
त्यामुळे आपला एखादा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी मानस ठेवला. त्यांना संगीत क्षेत्रातील आवड असल्याने आणि रेकॉर्डिंग करण्याचा अनुभव असल्याने त्यांनी स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू केला. हे सर्व करताना त्यांना त्यांच्या परिवाराची अमूल्य अशी साथ लाभली.

अनंत बाईत यांना ध्वनीमुद्रण क्षेत्रात जी प्रतिमा प्राप्त झाली आहे ती सहजपणे प्राप्त झालेली नाही. त्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली आहे. त्यामध्ये त्यांचे कठोर परिश्रम, जिद्द दिसून येते. त्यांनी आपल्या गोड वाणीने, वर्तणुकीने, आणि अभ्यासूवृत्तीने आपल्या जीवनात ध्वनीमुद्रण क्षेत्राला विशेष महत्त्व दिले आणि कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत, दूरदृष्टी ठेवून, भविष्याचा वेध घेऊन नियोजनात्मक पाऊले टाकली आहेत. या व्यवसायात आपली स्वतःची एक शैली निर्माण केली आहे. एखाद्या कलावंताला कलेची आवड असल्यावर तो जीवनाच्या पायऱ्या सचोटीने चढत जातो. याचे श्री बाईत हे स्वतः उदाहरण आहेत.
त्यांनी मराठी, हिंदी, नमन, भजन, शक्ती तुरा अशा अनेक प्रकारची गाणी त्यांनी रेकॉर्डिंग केली आहेत. नवीन गायक, शाहीर यांना त्यांचे विशेष मार्गदर्शन लाभते.

या सर्व कामाची कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई यांनी दाखल घेत अनंत बाईत यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांना ” स्वरध्वनी” पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. या सन्मानबाबत श्री बाईत यांनी मंडळाचे आणि सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. या कार्यक्रमा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कलगी तुरा शाखांचे मान्यवर उपस्थित होते.