दापोली :
दापोली तालुक्यातील मांदिवली गावातील पुलावर १८ टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांची वाहतूक धोकादायक असल्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. पुलाच्या सुरुवातीला १८ टनांपेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना कठोरपणे बंदी असल्याचा सूचना फलकही उभारण्यात आला आहे. मात्र या फलकाचे अस्तित्व पायदळी तुडविल्याप्रमाणे दुर्लक्षित करत मायनिंगमध्ये उत्खनन केलेली माती याच पुलावरून ३० ते ४० टन वजनाच्या वाहनांतून नेली जात असल्याचे प्रत्यक्ष पाहावयास मिळत आहे.
मायनिंग कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली ही जडवाहतूक पुलाच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करत आहे. पुलाची क्षमता मर्यादित असल्याने तो केवळ हलक्या वाहनांसाठी सुरक्षित आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करत दिवसाढवळ्या मोठे डंपर, ट्रक आणि जड मालवाहू वाहने पुलावरून धावत आहेत. वाहनचालक मात्र शासनाने उभारलेला सूचना फलकाला केराची टोपली दाखवत बिनधास्तपणे याच पुलावरून मार्गक्रमण करताना पाहावयास मिळत असल्याने, स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
या निष्काळजी वाहतुकीमुळे पुलाखालील गाभा कमकुवत होत चालल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा ग्रामस्थ देत आहेत. नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असतानाही संबंधित विभाग, पोलिस यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची मूक भूमिका अधिकच प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे.
नागरिकांनी तातडीने या वाहतुकीवर नियंत्रण आणून पुलाची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा एखादा अनर्थ ओढविल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहील? हा प्रश्न सतत उपस्थित होत आहे.












