दापोली प्रतिनिधी: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक ३१ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करत असतात. त्यासाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याने पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. दापोली पोलिसांची रात्रभर करडी नजर असणार आहे. त्याचबरोबर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत आहेत.
दापोली मध्ये पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुकी मासे खाण्यासाठी व खरेदीसाठी हजेरी लावत असतात. मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दापोलीचे थंड अल्हाददायक वातावरण, दापोली शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला केळशी ते दाभोळ पर्यंतचा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा आणि नारळी -फोपळीच्या बागांची सावली यामुळे पर्यटकांकडून दापोलीतील समुद्रकिनाऱ्याला जबरदस्त पसंती मिळत आहे. दापोलीत मुरुड, कर्दे, हर्णे, आंजर्ले, दाभोळ, बुरोंडी, आडे, केळशी आदी ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा करत असतात. समुद्रकिनारी मोठी गर्दी उसळलेली असते. रिसॉर्ट, फार्महाऊसमध्ये मोठ्या पार्टाचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर हॉटेल मध्ये पार्टीचे आयोजित केल्या जातात. शहरी भागात सोसायट्यांचे आवार आणि गच्चीवर पार्ट्या झाडत असतात.
स्वागतासाठी सामान्य नागरिक व महिलादेखील मोठया प्रमाणात घराबाहेर आलेल्या असतात. मात्र काही मद्यपी व्यक्ती अशावेळी मद्यपान करुन वाहने चालविणे, सार्वजनिक ठिकाणी दंगामस्ती करणे अशाप्रकारचे कृत्य करतांना आढळून आल्यास त्यांचेवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. दापोली पोलिसांच्या वतीने मोठा प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. टवाळखोरी करणारे, मद्यपान करुन वाहन चालवणारे तसेच बेदरकापणे वाहन चालवणाऱ्या व बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेकडून व पोलीस ठाणे यांचेकडून ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. यावेळी ब्रीथ अॅनालाझरद्वारे तपासणी केली जात आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतप्रसंगी नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करतांना कायदयाचे पालन करावे व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता दक्षता घ्यावी. असे आवाहन दापोली पोलिसांकडून करण्यात आले आहे. या नाकाबंदीकरीता दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, श्री. यादव, पीएसाय पाटील, वाहतूक शाखेचे श्री घाणेकर, श्री. क्षिरसागर, श्री.दिंडे, आदी पोलीस कर्मचारी व होमगार्ड या नाकाबंदी च्या वेळी उपस्थित होते.











