महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची (MCA) निवडणूक प्रक्रिया जळगाव येथे नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत रत्नागिरीचे ज्येष्ठ बुद्धिबळ मार्गदर्शक व रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री. श्रीराम खरे यांची महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढला असून जिल्ह्यातील बुद्धिबळ चळवळीला नवी उभारी मिळणार आहे. या निवडणूक सभेला MCA आधारस्तंभ श्री. अशोक जैन तसेच अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाकडून लाभलेले अधिकृत निरीक्षक श्री. ए. के. रायजादा उपस्थित होते. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे प्रतिनिधी या सभेस उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीत श्रीराम खरे यांच्यासह विविध विभागांतील अनुभवी व दूरदृष्टी असलेले सदस्य निवडून आले आहेत. उपाध्यक्षपदी खरे सरांची झालेली निवड ही रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक व बुद्धिबळप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. उपाध्यक्षपदी निवडल्यानंतर खरे सरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “रत्नागिरी आणि कोकणात बुद्धिबळविकासासाठी अधिकाधिक उपक्रम राबवण्याचा आमचा संकल्प आहे. राज्यभरातील खेळाडूंना समान संधी मिळाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू.” ही निवड रत्नागिरीच्या बुद्धिबळ चळवळीला नवसंजीवनी देणारी ठरेल, असा विश्वास जिल्ह्यातील खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.
संपूर्ण कार्यकारिणी अशी : अध्यक्ष: डॉ. परिनय फुके (गोंदिया), कार्याध्यक्ष: सिद्धार्थ मयूर (जळगाव), मानद सरचिटणीस: निरंजन गोडबोले (पुणे), खजिनदार: भरत चौगुले (कोल्हापूर); उपाध्यक्ष : सुनील रायसोनी (नागपूर), चिदंबर कोटीभास्कर (सांगली), श्रीराम खरे (रत्नागिरी); सहसचिव: सतीश ठाकूर (जालना) डॉ. दीपक तांडेल (ठाणे) अश्विन मुसळे (चंद्रपूर) ; कार्यकारणी सदस्य: जीएम अभिजीत कुंटे, जीएम विदित गुजराथी, आयएम सौम्या स्वामीनाथन, डब्ल्यूजीएम स्वाती घाटे; नियुक्त सदस्य: राजेंद्र कोंडे (उपाध्यक्ष), अंकुश रक्ताडे (सहसचिव), रविंद्र धर्माधिकारी (सहसचिव)












